mother in law : सासू-सुनेने फुलवली नर्सरी - nursery blossoms with mother-in-law and daughter in law

mother in law : सासू-सुनेने फुलवली नर्सरी – nursery blossoms with mother-in-law and daughter in law

म. टा.वृत्तसेवा शाहूवाडी

पर्यावरण संतुलित राखण्यात अनन्यसाधारण महत्वाच्या ठरणाऱ्या रोपवाटिका उद्योगात अश्विनी सुबोध भिंगार्डे व मंजिरी अंगद भिंगार्डे (रा. मलकापूर, ता. शाहूवाडी) या सासू-सुनेने मोलाची साथ दिली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीर ‘स्त्री’चा हात असतो, याचेच ‘शैलेश नर्सरी‘ हे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे.

१९८३ साली, आव्हानात्मक परिस्थितीत कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत येलूर (ता. शाहूवाडी) नजीक केवळ १२०० चौरस फूट जागेत अश्विनी यांनी पती सुबोध भिंगार्डे यांच्याबरोबर राहून सुरू केलेला शैलेश नर्सरीचा प्रकल्प आज ३७ वर्षांनंतर तब्बल ३५ एकर क्षेत्रात विस्तारला आहे. येथे भेट दिल्यानंतर नर्सरी विश्वातील ‘शैलेश’चे वेगळेपण सहज आणि ठळकपणे दिसून येते.

ऐंशी-नव्वदच्या दशकात झाडांची लागवड करणे वेडेपणाचे लक्षण समजले जात होते. त्याकाळात कृषी पदवीधर असलेल्या सुबोध यांनी पत्नी अश्विनी यांच्या साथीने शैलेश नर्सरीची सुरुवात केली. मुलगा अंगद यांच्या विवाहानंतर सून मंजिरी याही याच क्षेत्रात कार्यरत झाल्या. रोटवाटिकेचे दैनंदिन व्यवस्थापन या दोघी पाहतात.

अलिकडे फुल व फळझाडांचे किफायतशीर महत्व तर शोभेच्या झाडांच्या आर्किटेक्चरचे महत्व वाढल्याने सर्व प्रकारच्या झाडांच्या मागणीत वाढ झाली आहे. व्यवसायाचे हे नेमके गणित ओळखून शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादित केलेल्या इनडोअर, आऊटडोअर, जंगली रोपे, मसाल्याची रोपे, औषधी वनस्पती तसेच अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचे संगोपन, संवर्धन तसेच परदेशी फळझाडे, शोभेच्या झाडांची विक्री ते करतात. लहानात लहान सहा इंच ते अगदी वीस फुटांवर वाढ झालेल्या झाडांचे एक हजारहून अधिक प्रकार येथे उपलब्ध आहेत.

भिंगार्डे कुटुंबातील चौथी पिढी आज रोपवाटिका क्षेत्रात कार्यरत आहे. अश्विनी यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अंगद व सून मंजिरी हे तिघे पूर्ण वेळ रोपवाटिकेचे काम पाहतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंगद व मंजिरी हे जोडपे नर्सरीतील इंच-इंच परिसर विकसित करीत आहे. गुणात्मक विकासाचा दृष्टीकोन ठेवून सुबोध भिंगार्डे हे या सर्वांवर लक्ष ठेवून कार्यरत आहेत.

वॉकीटॉकीद्वारे संवाद

३५ एकरातील शैलेश नर्सरीत शंभरहून अधिक कर्मचारी आहेत. भिंगार्डे कुटुंबीयांनी शंभरहून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वॉकीटॉकीसारख्या संपर्क यंत्रणेच्या वापरातून हे कर्मचारी संवाद साधत ग्राहकांच्या अडचणी किंवा पूरक माहिती एकमेकांना देतात. यामुळे ग्राहकसेवे बरोबरच वेळेची सांगड घालून व्यवसाय हाताळणे सोपे झाले आहे. नेट बँकिंग, डेबीट-क्रेडीट यासह ऑनलाइन विक्री व वाहतुकीची सुविधा असणारी शैलेश रोपवाटिका राज्य व राज्याबाहेरील निसर्गप्रेमींमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यात कमालीची यशस्वी ठरली आहे.

Source link
]

Leave your comment
Comment
Name
Email