सीपीआरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू

सीपीआरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू

ोल्हापूर ः प्रतिनिधी 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. रुग्णाच्या नातेवाईकाकडे डिस्चार्जसाठी स्टेशनरी साहित्य मागणीची चौकशी केली जाईल. सर्वसामान्यांचे  आधारवड असणार्‍या या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी दिली. 

शुक्रवारी मंत्री पाटील यांनी सीपीआरला सदिच्छा भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी मंत्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. गजभिये यांनी कंत्राटी, चतुर्थ श्रेणी, प्राध्यापक यासह रिक्त पदांबाबत माहिती दिली. हापकीनकडून औषधांसाठी होणारा विलंब यावरही चर्चा केली गेली. राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांना घरगुती दरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, सीपीआरला औद्योगिक दरात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सुमारे 3 कोटी रुपये पाणी बिल थकीत आहे. रुग्णांची संख्या वाढली असून येथे महिला व पुरुष असे बाह्यरुग्ण नोंदणी कक्ष स्वतंत्र होणे गरजेचे आहे. सीपीआरमध्ये पी. जी. शिक्षणासाठी पाठपुरावा सुरू आहे.  एमआरआय उपकरणाची प्रतीक्षा आहे. या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची  विनंती डॉ. गजभिये यांनी केली. 

मंत्री पाटील म्हणाले, शेंडा पार्क येथे वैद्यकीय महाविद्यालयाची विकासकामे सुरू आहेत. ती दर्जेदार झाली पाहिजेत. सीपीआरमधील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करा. औषधे आणि निधीसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील. दैनिक ‘पुढारी’मध्ये सीपीआरबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची आम्ही दखल घेतो, असेही मंत्री पाटील म्हणाले. रुग्णाच्या नातेवाईकाला डिंक, टाचण्या कोणी आणायला लावल्या, याची चौकशी करा, असेही ते म्हणाले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. हृदय शस्त्रक्रिया, डायलेसिस आणि ट्रॉमाकेअर विभागाची मंत्री पाटील यांनी पाहणी केली. सीपीआरमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती मंत्री पाटील यांनी घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, डॉ. तेजस्विनी सांगरूळकर, डॉ. अजित लोकरे, डॉ. बी. वाय. माळी, डॉ. विठ्ठल कारंडे, डॉ. वसीम मुल्ला, डॉ. व्ही. ए. देशमुख, डॉ. सुदेश सरवदे, डॉ. शिरिष शानभाग, डॉ. सुनीता रामानंद, डॉ. बनसोडे, डॉ. राहुल बडे, डॉ. गिरीष बारटक्के, डॉ. सुभाष नांगरे आदी उपस्थित होते. 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email