मासिक पाळीविषयीचे गैरसमज | पुढारी

मासिक पाळीविषयीचे गैरसमज | पुढारी

डॉ. प्राजक्ता पाटील

मुलगी वयात आली म्हणजे साधारण 12 ते 15 वर्षे वयोगटात तिला मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. तेव्हापासून मासिक पाळीचे चक्र साधारणतः वयाच्या पन्नाशीपर्यंत अव्याहत सुरू राहते. मासिक पाळी या अत्यंत महत्त्वाच्या शारीरिक आरोग्याच्या बाबीविषयी अजूनही समाजात मोकळेपणाने चर्चा होत नाही. परिणामी, आजच्या काळातही अनेक गैरसमज मात्र मासिक पाळी नावाच्या अटळ बदलाला चिकटून आहेतच. मासिक पाळी नियमित येणे हे स्त्री आरोग्यासाठी आवश्यक आहेच, तरीही या काळात किंवा याविषयी आपल्याला होणारे त्रास आजही स्पष्टपणे बोलून दाखवणारा स्त्री वर्ग कमीच आहे. त्यातूनही मासिक पाळीविषयी गैरसमजुती अधिक आहेत.

मासिक पाळी ही मुलीच्या साधारणपणे वयाच्या 12 व्या वर्षांपासून सुरू होते, ती पन्नाशीपर्यंत अव्याहत सुरू असते. सर्वसाधारणपणे मासिक पाळी येते त्या काळात अनेक मुलींना वेगवेगळे त्रास होतात. कोणाला डोेकेदुखी, कोणाला कंबरदुखी, ओटीपोटात दुखणे हे तर अपवाद वगळता सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात जाणवते. त्याच बरोबर एक महत्त्वाची गोष्ट होते, ती म्हणजे मनोवस्थेत अचानक होणारे बदल किंवा मूड स्विंग्स. या सर्वांचा थेट परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होत असतो. हे नाकारून चालणार नाही. आधीच मासिक पाळीविषयीचा बाऊ केला गेल्याने स्त्रिया याबाबतीत मोकळेपणाने बोलणे आजही दुर्लभ आहे. त्यामुळे या समस्या डॉक्टरांपर्यंत पोहोेचवणेही कठीणच; मात्र मासिक पाळीविषयी स्त्रिया अनेक गैरसमज मनात बाळगून असतात. सरतेशेवटी त्याचा परिणाम त्यांचा आरोग्यावर दिसतो. 

मुलीच्या अगदी लहान-मोठ्या सर्व समस्यांवर लक्ष ठेवणारी, स्त्रियांच्या आरोग्य आणि काळजी याविषयी काम करणारी वेलनेस साईट हेल्थ शॉटस्वर एक अहवाल प्रकाशित झाला. त्यानुसार आजही महिलांच्या मनात मासिक पाळीविषयी 3 गैरसमज पक्के आहेत. या गैरसमजांमुळे महिलांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे.

1. 28 दिवसांत पाळी न आल्यास नक्कीच काही समस्या ः मासिक पाळीचे एक चक्र असते ते प्रत्येकीचे वेगळे असू शकते. सर्वसाधारणपणे 28 दिवसांचे हे चक्र असते; पण प्रौढ स्त्रियांमध्ये ते 21 ते 37 दिवस, तर किशोरवयीन मुलींमध्ये ते 21 ते 45 दिवस इतके असू शकते. पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढची पाळी येण्याच्या दिवसांदरम्यानचा हा काळ असतो. त्यामुळे एखादीला 28 दिवसांऐवजी 35 दिवसांनी पाळी आली, तर त्यात घाबरण्यासारखे मुळीच काही नाही. मासिक पाळीतील चक्रात होणारा बदल हा तणाव, आहारातील बदल, 

हार्र्मोेनल बदल आणि हवामान या कारणांमुळेही असू शकतो. हा काळ वाढून 37 दिवसांचा झाला, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. काही गडबड आहे का, असा विचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे आश्वस्त करणारे असेल. 

2. मासिक पाळीत अशुद्ध रक्ताचा स्त्राव 

अनेक वर्षांपासून हा भ्रम होता, की मासिक पाळीत शरीराबाहेर टाकले जाणारे रक्त हे अशुद्ध रक्त असते; मात्र ही धादांत चुकीची गोष्ट आहे. मासिक पाळीच्या काळात शरीरातून बाहेर पडणारे रक्त हे शरीरातील सर्वसाधारण रक्ताप्रमाणेच असते. फक्त त्यात नेहमीच्या रक्ताच्या तुलनेत कमी प्रमाणात रक्तपेशी असतात.

3. मासिक पाळीमध्ये गर्भधारणा होत नाही 

मासिक पाळी सुरू असताना शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होत नाही. म्हणजेच पाळीच्या काळात संबंध ठेवल्यास ते सुरक्षित असतात, असे अनेकांना वाटते; मात्र हा गैरसमज आहे. मासिक पाळीच्या काळात ओव्हल्यूशन म्हणजेच बीजकोषातून बीजांडे बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्या काळातही गर्भधारणा होण्याची शक्यता कायम असते. मासिक पाळीविषयीचे हे तीन गैरसमज आजही स्त्रियांच्या मनात टिकून आहेत. मोकळेपणाने बोलत नसल्याने या सर्वांचा त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.Source link

Leave your comment
Comment
Name
Email