'मानवी जीवनाच्या स्थैर्यासाठी शाश्वत विकासाची गरज'

‘मानवी जीवनाच्या स्थैर्यासाठी शाश्वत विकासाची गरज’

कोल्हापूर : प्रतिनिधी

ग्लोबल वार्मिंग, वाढती लोकसंख्या, महागाई, कुपोषण ही जगासमोरील मोठी आव्हाने आहेत. मानवास स्थैर्य लाभून चांगले जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत विकास करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी केले.

देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स व आर. एन. गोडबोले अध्यासन व दै. ‘पुढारी’ पब्लिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत विकासातील जागतिक आव्हाने’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम होत्या. बीजभाषण इन्स्पायर अ‍ॅकॅडमी, पुणेचे संचालक डॉ. कैलास एन. बावले यांनी केले. 

डॉ. भोजे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा समाजातील सर्व स्तरातील घटकांना पुरविणे विकसनशील राष्ट्रांपुढील आव्हान आहे. नैसर्गिक स्रोतांचा अमर्यादित वापर सुरू आहे. सौर, पवनऊर्जा याचा वापर करणे आवश्यक आहे. अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. रॉडने एच. क्लारकेन  म्हणाले, वंशवाद, लिंगभेद, वर्गवाद, राष्ट्रवाद आणि धर्मवाद याबाबत जागतिक समाजात असणारा पूर्वग्रह द़ृष्टिकोन हाच शाश्वत विकासातील मुख्य अडथळा आहे.  

कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, जमिनीचे विभाजन झाल्याने दरडोई उत्पन्न खालावले असून जीवनमानाचा दर्जा घसरला आहे. दर्जेदार शिक्षण दिले तर देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. दुपारच्या सत्रात विविध विषयांवरील संशोधन पेपरचे सादरीकरण झाले. यावेळी डॉ. विश्वनाथ मगदूम, अ‍ॅड. व्ही. एन. पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. बी. टी. नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बी. जी. नेर्लेकर यांनी आभार मानले. 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email