भीमा कोरेगाव तपासावरून शरद पवारांची नाराजी; म्हणाले...

भीमा कोरेगाव तपासावरून शरद पवारांची नाराजी; म्हणाले…

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील एल्गार परिषद आणि त्यानंतर कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीचा तपास राष्ट्रवादीचा विरोध डावलून अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजीचा सूर व्यक्त केला.

वाचा : एल्गार तपास ‘एनआयए’कडे

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की हा राज्याच्या गृह खात्याच्या अखत्यारीतील विषय होता. त्यामुळे याचा तपास राज्य पातळीवर व्हावा अशी आपली भूमिका होती. पण हा तपास कोणाकडे द्यायचा याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. याबाबत आपण कोणतेही भाष्य करणार नाही.

बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने लागू केलेला एनआरसी कायदा हा समाजामध्ये असमतोल निर्माण करणारा आहे. सध्या या कायद्याच्या विरोधात मुस्लिम समाज एकजूट झाला आहे. भविष्यात अन्य समाजातील लोक या कायद्याला विरोध करतील. कारण हा कायदा काही समाज घटकांवर अन्याय करणारा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये आप पक्षाला मिळालेल्या बहुमताबद्दल विचारले असते पवार म्हणाले की, दिल्लीमध्ये देशातील विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. दिल्लीच्या प्रचारामध्ये केंद्र सरकारचे अनेक मंत्री व भाजपचे नेते सहभागी झाले होते. असे असतानाही तेथील जनतेने विकास कामाला मत दिले. त्यामुळे दिल्लीमधील विजय हा देशाच्या राजकारणातील परिवर्तनाची नांदी आहे, असे समजायला हरकत नाही.

वाचा : एल्गार प्रकरण ‘एनआयए’कडे वर्ग करण्यास पुणे पोलिसांचाही विरोध

भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर पीएचडी करणार असे वक्तव्य केले आहे. यावर शरद पवार म्हणाले, की नुकतेच त्यांना मी दिल्लीतील प्रचारात पक्षाची पत्रके वाटताना पाहिले. ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या विषयी मी काय बोलणार, असा टोला लगावला.

कोल्हापुरला खंडपीठ व्हावे अशी आपली भूमिका आहे. मुंबईकरांचा केवळ कोल्हापूरलाच नाही तर पुण्यालाही खंडपीठ होण्याला विरोध आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकाराबद्दल आपण समाधानी आहात का? असे विचारता सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. लगेच त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. पण तीन पक्ष एकत्र करून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना या तिनही पक्षाचे नेते एकत्र येऊन निर्णय घेतात. ही चांगली बाब असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email