बॉम्ब निकामी करताना स्फोट होऊन एक ठार

बॉम्ब निकामी करताना स्फोट होऊन एक ठार

नगर : पुढारी वृत्तसेवा

लष्कराच्या खारे कर्जुने (के. के. रेंज) युद्ध सराव क्षेत्रातील जिवंत बाँब निकामी करताना झालेल्या स्फोटात भिवा सहादू गायकवाड (वय 55) हे ठार झाले. शुक्रवारी (दि.14) सकाळी 11 वाजता हा भीषण स्फोट झाला.

के. के. रेंजमध्ये रणगाडा चालविणे आणि रणगाड्यातून बॉम्ब टाकण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या सरावाच्या वेळेस वापरण्यात आलेले बॉम्ब के. के. रेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर पडलेले असतात. या वापरलेल्या बॉम्बच्या अवशेषांमध्ये तांबे, पितळ, शिसे आदी किमती धातू असतात. या धातूंना बाजारात मोठी किंमत मिळते त्यामुळे  काही जण बेकायदेशीरपणे लष्करी हद्दीत घुसून बॉम्बचे अवशेष गोळा करतात. भिवा गायकवाड शुक्रवारी सकाळी लष्करी हद्दीत गेले होते. त्यांनी काही बॉम्ब जमा करून गावाच्या हद्दीजवळील एका ओढ्यात आणले. तेथे ते बॉम्बमधील धातू वेगळे करत होते. त्यावेळेस एका बॉम्बचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. या ओढ्याजवळील झाडा-झुडपांवर त्यांचे शरीराचे तुकडे अडकले होते. या भागातून जनावरे चारण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ग्रामस्थांनाही याची माहिती दिली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भागाकडे धावले.  मृतदेहावरून कोणतीही ओळख स्पष्ट होत नव्हती. मृताच्या कुटुंबीयांनी त्यांना ओळखले. 

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसेंसह पथक या ठिकाणी आले. त्यांनी लष्करी अधिकार्‍यांना ही घटनेची माहिती दिली. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळास भेट दिली.

भिवा गायकवाड हे कुटुंबातील कमविते व्यक्‍ती होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती समजल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली होती. 

जनावरे चारण्यासाठी गेल्याचा दावा

मृत भिवा गायकवाड यांच्या नातेवाईकांनी लष्करी हद्दीतून बॉम्बचे सुट्टे भाग आणण्यासाठी गेल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तेे लष्करी हद्दीजवळ जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या बॉम्बच्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.Source link

Leave your comment
Comment
Name
Email