निर्भयाच्या खुन्यांचे सर्व कायदेशीर पर्याय संपले

निर्भयाच्या खुन्यांचे सर्व कायदेशीर पर्याय संपले

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

निर्भया प्रकरणातील दोषी विनयची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका विनयकडून दाखल करण्यात आली होती. विनयची ही याचिका फेटाळण्यात आल्याने या प्रकरणातील तीन दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत.

विनयची शारीरिक स्थिती तसेच मानसिक संतुलन ढासळले आहे. शिवाय राष्ट्रपतींसमक्ष सरकारतर्फे सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती. विनयतर्फे राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जावर दिल्लीच्या नायब राज्यपालांची स्वाक्षरी नव्हती, असा दावा याचिकेतून करण्यात आला होता. न्यायमूर्ती आर. भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण तसेच न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांनी दोषीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर याचिका फेटाळली. 

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींना भोवळ

निर्भया प्रकरणातील दोषींना वेगवेगळी फाशी देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. प्रकृती अस्वस्थ असताना देखील न्यायमूर्ती भानुमती यांच्या खंडपीठासमक्ष याचिकेसंबंधी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आदेश लिहिण्यापूर्वीच न्यायमूर्ती भानुमती यांची प्रकृती बिघडली. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना भोवळ आली. 

न्यायालयातील महिला कर्मचार्‍यांच्या मदतीने त्यांना व्हीलचेअरवरून त्यांच्या चेंबरमध्ये नेण्यात आले. याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असली, तरी न्यायमूर्ती भानुमती यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे खंडपीठाने निकाल 20 फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला.Source link

Leave your comment
Comment
Name
Email