नगरसेवकाची अधिकार्‍याला मारहाण; मनपाचे कामकाज ठप्प

नगरसेवकाची अधिकार्‍याला मारहाण; मनपाचे कामकाज ठप्प

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांना बुधवारी सकाळी शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचे पडसाद गुरुवारी सकाळी महापालिकेत उमटले. महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. परिणामी, महापालिकेचे कामकाज ठप्प झाले. दरम्यान, यापुढे कोणत्याही नगरसेवकांनी मारहाण केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार महापालिका कर्मचारी संघाने केला.  

आपटनेगर पंपिंग स्टेशनमध्ये मारहाण…

क्रांतिसिंह नाना पाटीलनगर-जीवबा नाना पार्क या प्रभागात काही ठिकाणी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीमुळे भागातील मेन रोडमधून मुख्य वितरण नलिका असल्याने जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करून नवीन व्हॉल्व्ह घालणे व तत्सम आवश्यक कार्यवाही करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाच्या वितरण शाखेकडून सुरू आहे. परंतु, नगरसेवक चव्हाण यांनी कामाबाबत असमाधान व्यक्‍त करून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता आटकर  यांना आपटेनगर पंपिंग स्टेशन येथे सकाळी पावणेबाराच्या सुमारास बोलावून घेतले. त्या ठिकाणी उपस्थित कर्मचार्‍यांसमोर शिवीगाळ करून पंपिंग स्टेशनच्या रूममध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अखेर इतर कर्मचार्‍यांनी आटकर यांना बाजूला करून त्यांची सोडवणूक केली. घटनेमुळे आटकर भयभीत झाले होते. आटकर यांनी गुरुवारी करवीर पोलिस ठाण्यात नगरसेवक चव्हाण यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली. 

घटनेची माहिती मिळताच कर्मचारी एकत्र…

महापालिका कर्मचारी संघाचे पदाधिकारी बुधवारी मुंबईला गेले होते. त्यामुळे बुधवारी कोणतेही आंदोलन झाले नाही. गुरुवारी सकाळी दहापासूनच पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी महापालिकेत जमू लागले. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांना घटनेची माहिती मिळाली. महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी महापालिका चौकात आले. सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी काम बंद करून चौकात जमले. या ठिकाणी एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वच अधिकारी व कर्मचारी महापालिका चौकात आल्याने कामकाज ठप्प झाले. त्यानंतर चौकात सभा झाली.

हात उगारला तर गप्प बसू नका…

अध्यक्ष भोसले म्हणाले, आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी स्वच्छतेचे चांगले काम करत आहेत. कर्मचारीही रविवारची सुट्टी न घेता स्वच्छता उपक्रमात सहभागी होत आहेत. परंतु, मारहाण करणारे असे नगरसेवक म्हणजे महापालिकेला कलंक आहेत. यांची स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. आपणही अधिकारी-कर्मचारी असा अन्याय असा किती दिवस सहन करायचा? कुठेतरी याला आळा बसायला पाहिजे. अन्यायाला कधीतरी विरोध करायला पाहिजेच. त्याची सुरुवात आतापासूनच करू. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत; पण माणूस आहोत की नाही? यापुढे निमूटपणे मार खायचा नाही. काय असेल तो एकदा सोक्षमोक्ष लावू. मारहाण करणार्‍या नगरसेवकांविरुद्ध जशास तसे वागायचे आहे. हात उगारला तर तुम्हीही गप्प बसू नका. मी तुमच्या सोबत आहे.

प्रशासन तोडगा काढत नाही ही शोकांतिका…

महापालिकेत 5 हजार 400 कर्मचारी आहेत. गेली अनेक वर्षे भरती झालेली नाही. परंतु, शहराची लोकसंख्या वाढली आहे. शहर परिसरातून रोज शहरात नोकरी-व्यवसायासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे. या सर्वाचा ताण शहरावर पडत आहे. तसाच हा ताण महापालिका कर्मचार्‍यांवरही पडत आहे. एकेका अधिकार्‍याकडे तीन-चार पदांचा कार्यभार आहे; पण प्रशासन यातून काहीही तोडगा काढत नाही ही शोकांतिका आहे. कर्मचारीही काही ठिकाणी चुकत असतील. परंतु, त्यासाठी नियम, कायदे आहेत. मारहाण कशासाठी करायची? कर्मचार्‍यांच्या मारहाणीवर तोडगा म्हणून यापूर्वी आचारसंहिता करण्याचे ठरले होते. मात्र, आचारसंहिताही झाली नाही, असेही भोसले यांनी सांगितले. 

कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष वणकुद्रे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे व रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले आदींची भाषणे झाली. यापुढे मारहाण सहन करायची नाही, असा निर्धार सर्वांनी केला. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या आंदोलनस्थळी भाजप गटनेता अजित ठाणेकर, नगरसेवक विजय खाडे यांनी भेट दिली. भाजप शहराध्यक्ष राहूल चिकोडे यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करून जिल्हा पोलिसप्रमुखांना कारवाईसाठी निवेदन द्यावे, असे सांगितले.

…तर अशाच घटनांची पुनरावृत्ती 

उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना एम. आय. एम. पक्षाचा पदाधिकारी विनाकारण त्रास देत होता. त्याप्रकरणी घाटगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्या पदाधिकार्‍याला महापालिकेत चांगलाच चोप दिला. आता यापुढे नगरसेवकांनी कर्मचार्‍यांवर हात उगारला तर अशाच घटनांची पुनरावृत्ती करावी लागणार आहे, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email