टी-२० प्रमाणे फटके मारून निधी आणू

टी-२० प्रमाणे फटके मारून निधी आणू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

टी-20 सामन्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरसाठी जास्तीत जास्त निधी आणणार आहोत. एक महिन्याच्या आत 47 कोटी रुपये निधी आणला. कोल्हापूर शहरासाठी 178 कोटींच्या रस्ते प्रकल्पाच्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी आणू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 25 कोटी रु.चा ठोक निधी दिला आहे, अशी घोषणा करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी महिन्याभरात शहरात 50 कोटींची कामे सुरू होतील, असे सांगितले.

महानगरपालिकेतर्फे श्री क्षेत्र करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सरस्वती टॉकीजनजीक आयोजित बहुमजली पार्किंग इमारत भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

महाडिकांवर टीकेची झोड

थेट पाईपलाईन योजनेबाबत वक्‍तव्य करून विरोधकांनी आम्हाला सावध केल्याबद्दल त्यांना धन्यवाद, असा उपरोधपूर्ण टोला माजी खासदार धनंजय महाडिक यांना त्यांचे नाव न घेता लगावून कोणत्याही परिस्थितीत थेट पाईपलाईन योजना पूर्ण करू, अशी ग्वाही  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठविली. महाडिक यांचे नाव न घेता ते म्हणाले, महापालिका आम्ही जिंकणार,  महापौर आमचा होईल,  पाणी पुरवठा योजना आम्ही पूर्ण करणार, अशी वल्गना करीत आहेत. पाणी योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले आहे. आम्हाला सावध केल्याबद्दल विरोधकांचे आभार मानतो. दर्शन मंडपाबाबत शेतकरी संघ संचालकांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे सांगून ते म्हणाले, या ठिकाणी आताच साधारणत: 500 गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करून एकदम प्रकल्प पूर्ण करू.

विरोधी महापालिका म्हणून  मागील सरकारने लक्ष दिले नाही. राजकारण, समाजकारणात सत्ता येते  आणि जाते. सत्तेत कोणी कायमचा येत नाही. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आपल्या भागाचा, जिल्ह्याचा  विकास करता आला पाहिजे. ग्रामीण विकासमंत्री म्हणून एवढा निधी आणू की, तुम्हीही थक्‍क व्हाल. त्या भागात आमदार कोणाचा आहे हा विचार करणार नाही, असा टोला त्यांनी महेश जाधव यांना लगावला. ऑक्टोबरमध्ये  महापालिका निवडणूक आहे. जास्तीत निधी आणून शहर विकासाभिमुख शहर करण्याचा प्रयत्न करू. लोकांनी आक्षेप घेता कामा नये, असे दर्जेदार काम करा. चांगले काम करा, चांगल्या बातम्या येतील, असे ते म्हणाले.

महिन्यात शहरात 50 कोटींची कामे सुरू होतील : पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, करवीर काशीचा विकास होण्यासाठी आराखडा तयार झाला आहे. मागील सरकारने पहिल्या टप्प्यास निधी  देऊन उर्वरित 90 ते 95 टक्के काम आपल्यावर टाकले आहे. महेश जाधव हुशार आहेत. ते नुसते नारळ फोडून गेले,  उर्वरित कामाची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. कोल्हापूरकरांनो, काळजी करू नका. आम्ही निधी देऊन हे काम पूर्ण करू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आराखड्यास निधी देण्याची विनंती केली आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने वेगळी वागणूक दिली. त्यामुळे महापालिकेस कमी निधी मिळाला. आम्ही सत्तेत येताच  रस्ते, अंतर्गत विकासासाठी प्रचंड निधी आणला. जिल्हा नियोजन मंडळातून नगरोत्थानमधून साडेचार कोटी रुपये दिले आहेत. दलित विकास निधी एक कोटी रुपये, नावीन्यपूर्ण योजनेतून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर सिग्‍नल सेवा अद्ययावत करणार आहोत. महापालिकेच्या ब्लड सेपरेशन युनिटसाठी दीड कोटी दिले आहेत. दलित वस्ती प्रभागासाठी 11 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. एक महिन्यात जिल्हा योजनेतून साडेबावीस कोटी रुपये दिले आहेत. काम पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. थेट पाईपलाईन आणि तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत सोमवारी आढावा बैठक घेणार आहे. देवस्थान समितीकडून आजूबाजूचे रस्ते करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल, महिन्याभरात शहरात  50 कोटींची कामे सुरू होतील.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला :डॉ. योगेश जाधव

डॉ. योगेश जाधव म्हणाले, 15 वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी लढत आहोत. ‘पुढारी’कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यात निधी मिळाला आहे. त्याची सुरुवात केली जात आहे. बहुमजली पार्किंग नवीन तंत्रज्ञानातून होणार आहे. पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. त्या लवकर व्हाव्यात. भूमिपूजन जसे गतीने घेतले, त्याच वेगाने उद्घाटन समारंभही त्वरेने व्हावा.

आ. चंद्रकांत जाधव म्हणाले,  शहरामध्ये पार्किंगची सोय अपुरी पडत आहे. त्यामुळे हे पार्किंग मंदिर परिसरात होणे गरजेचे होते. शहरामध्ये एक हजार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आवश्यक आहे. शहराचा विकास झाला तर रोजगारनिर्मिती होईल, इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, पर्यटन वाढेल. हे काम ठेकेदाराने दर्जेदार करावे. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले,  तीर्थक्षेत्र विकासकामातील दर्शन मंडप विद्यापीठ हायस्कूल येथील पार्किंगमध्ये बांधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी भवानी मंडपातील शेतकरी संघाची जी इमारत आहे, ती देवस्थानला उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी दर्शन मंडप व अन्‍नछत्र सुरू करण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दर्शन मंडपाची 9 कोटींची रक्‍कम जर देवस्थानला दिली तर उर्वरित 20 कोटी देवस्थान शेतकरी संघास देऊन ती जागा विकत घेऊन हा प्रश्‍न मार्गी लागेल.

महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी प्रास्ताविकात शहराच्या सर्वांगीण विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले असून येत्या काळात कोल्हापूर व जिल्ह्यातील रखडलेल्या जवळपास सर्वच योजना व प्रकल्पांची निश्‍चित पूर्तता होईल, असे सांगितले.

कार्यक्रमास आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, परिवहन समिती सभापती सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, प्रभाग समिती सभापती सौ. हसिना फरास, गटनेता शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, राहुल चव्हाण, स्थानिक नगरसेवक शेखर कुसाळे, अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, तौफिक मुल्‍लाणी, सुभाष बुचडे, सचिन पाटील, नियाज खान, लाला भोसले, आशिष ढवळे, नगरसेविका सौ. माधुरी लाड, सौ. वहिदा सौदागर, अतिरिक्‍त आयुक्‍त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, ठेकेदार व्ही. के. पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगरसेवक शेखर कुसाळे यांनी आभार मानले. 

Source link

Leave your comment
Comment
Name
Email