छायाकल्प चंद्रग्रहणाचा विद्यार्थ्यांसह खगोलप्रेमींनी लुटला आनंद

छायाकल्प चंद्रग्रहणाचा विद्यार्थ्यांसह खगोलप्रेमींनी लुटला आनंद

कोल्हापूर : प्रतिनिधी

वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी रात्री छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लुटला.

शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या छतावरून छायाकल्प चंद्रग्रहण विद्यार्थी व नागरिकांना पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. सूर्यग्रहण झाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनी चंद्रग्रहण दिसते. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. ज्यामध्ये पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते व चंद्रग्रहण दिसू लागते.

कोल्हापुरात शुक्रवारी रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी चंद्रग्रहणास सुरुवात झाली. हे ग्रहण छायाकल्प या प्रकारचे होते. यामध्ये पृथ्वीच्या उपछायेतून चंद्र गेल्याने तो तांबूस रंगाचा दिसला. चंद्रग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही, त्यामुळे  उघड्या डोळ्यांनी व दुर्बिणीच्या सहाय्याने हे चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद नागरिकांना घेता आला. 

भौतिकशास्त्र विभागातील, अवकाश विज्ञान प्रयोगशाळेमध्ये असणार्‍या 12 इंची दुर्बिणीच्या सहाय्याने  विद्यार्थी व नागरिकांनी चंद्रग्रहणाचे निरीक्षण केले. ग्रहणाच्या सुरुवातीला चंद्राची तेजस्विता ही -1.1 ऐवढी होती. मध्याच्यावेळी -0.12 ऐवढ्या कमी तेजस्वीतेने चंद्रबिंब दिसले. छायाकल्प चंद्र ग्रहणाचा कालावधी 4 तास 5 मिनिटे होता. चंद्रग्रहणाचा  रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी मध्य होता.  हे चंद्रग्रहण पहाटे 2 वाजून 42 मिनिटांनी सुटले, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email