कोल्हापूर : मोक्कातील आरोपीचे कोर्टातून पलायन, फिल्मी स्टाईलने ठोकली धूम

कोल्हापूर : मोक्कातील आरोपीचे कोर्टातून पलायन, फिल्मी स्टाईलने ठोकली धूम

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज प्रथम वर्ग न्यायालयाकडे सुनावणीसाठी आणलेला मोक्कातील आरोपी श्रीधर अर्जुन शिंगटे हा आज दुपारी पोलिसांच्या हातावर तुरी देवून न्यायालयातून पळून गेला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या आरोपीला न्यायालयातून सहजपणे पळून जाता आले. फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेने न्यायालय परिसरामध्ये खळबळ उडाली. आरोपी पळून गेल्याचे समजताच न्यायालय परिसरामध्ये फार मोठया प्रमाणात पोलिस जमा झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांनी तातडीने पोलिसांची वेगवेगळी पथके करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. हलगर्जीपणा केलेल्या सहाय्यक फौजदारालाही जाधवर यांनी चांगलेच फैलावर घेतले.

उद्योजक रमेश रेडेकर यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिंगटे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणाची आज (दि. ४) न्यायालयात सुनावणी होती. शिंगटे याच्यावर अनेक पोलिस ठाण्यांमध्ये मद्य तस्करीसह अन्य गुन्हे दाखल आहेत.  आज कळंबा कारागृहातून गडहिंग्लज न्यायालयामध्ये आरोपीला आणण्यात आले होते. यामध्ये शिंगटेसह अन्य दोन आरोपींचा समावेश होता. 

शिंगटेला घेवून सहाय्यक फौजदार भारत बारटक्के न्यायालयात हजर झाले होते, तर अन्य आरोपींना घेऊन त्याचे अन्य दोन साथीदार दुसर्‍या न्यायालयामध्ये गेले होते. प्रत्यक्ष घटनास्थळावर असलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार दुपारी न्यायालयातील कामकाजानंतर पोलिस बारटक्के हे शिंगटेला घेऊन न्यायालयातील कॅन्टीनमध्ये नाष्टयासाठी गेले होते. याठिकाणी शिंगटे याने हातातील बेडी जड होत असून खाण्यापुरती काढा, अशी मागणी केली. त्यानंतर बारटक्के यांनी त्याची बेडी काढून आपल्या हातात घेतली व दोघेही नाष्टा करत होते. 

नाष्टयामध्ये अन्य पदार्थ पाहिजे असे सांगून शिंगटे हा खूर्चीवरून उठून कॅन्टीनच्या काउंटरपर्यंत गेला तोपर्यंत बारटक्के हे त्याला पाहतच होते. कॅन्टीनजवळच्या काउंटरपासून शिंगटे याने धूम ठोकत थेट बाहेरच पोबारा केला. शिंगटे पळून गेल्याचे लक्षात येताच बारटक्के त्याच्या मागे धावले. मात्र शिंगटेने तोवर न्यायालयाच्या बाहेर धूम ठोकली होती. शिंगटेचे अन्य साथीदार बाहेर वाट पहात होते त्याच्या मदतीने शिंगटेने अन्यत्र पलायन केले. धावण्याच्या गडबडीत शिंगटेचे चप्पलही न्यायालय परिसरामध्ये पडले होते.

आरोपी पळून गेल्याचे समजताच मोठा पोलीस फौजफाटा जमा झाला. मोक्कातील आरोपीला न्यायालयीन सुनावणीसाठी आणताना केवळ एक सहाय्यक फौजदाराचा बंदोबस्त कसा काय असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. 

 

Source link
]

Leave your comment
Comment
Name
Email