कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना : शरद पवार

कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना : शरद पवार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव-भीमा येथील दंगलीचा तपास कोणाकडे द्यायचा याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. त्याबद्दल आपण भाष्य करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. यातून त्यांची नाराजी लपली नाही. एनआरसी कायदा देशात असमतोल निर्माण करणारा असल्याने त्याला विरोध होणार, असेही ते म्हणाले.

कोरेगाव-भीमा दंगलीचा तपास एसआयटीने करावा, अशी आपली मागणी होती. पण ती डावलून तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याबाबत विचारता पवार म्हणाले, कोरेगाव- भीमा दंगलीचा विषय हा राज्याच्या गृह खात्याच्या अखत्यारीतील होता. त्यामुळे याचा तपास राज्य पातळीवर व्हावा, अशी आपली भूमिका होती. राज्याचे अधिकार केंद्राने काढून घेणे योग्य नाही. महाराष्ट्राने त्यामागे जाणे चुकीचे आहे. पण तपास कोणाकडे द्यायचा याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे.

दिल्‍लीमध्ये ‘आप’ला मिळालेल्या यशाबद्दल पवार म्हणाले, दिल्‍लीत विविध जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. तेथील प्रचारात केंद्र सरकारचे अनेक मंत्री व भाजपचे नेते सहभागी झाले होते. असे असतानाही तेथील जनतेने विकासकामाला मत दिले आहे. त्यामुळे दिल्‍लीमधील विजय हा देशाच्या राजकारणातील परिवर्तनाची नांदी आहे, असे समजायला हरकत नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्यावर पीएचडी करणार असल्याचे म्हणाले. याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, नुकतेच त्यांना मी दिल्‍लीत घराघरांत पक्षाची पत्रके वाटतानाचा फोटो पाहिला आहे. ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या विषयी  आपण काय बोलणार, असा टोला लगावला.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल आपण समाधानी आहात का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. लगेच त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. पण तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना या तीनही पक्षांचे नेते एकत्र येऊन निर्णय घेतात. ही चांगली बाब आहे. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के.पोवार आदी उपस्थित होते.

आज मुस्लिमांचा विरोध; उद्या अन्य समाजही विरोध करणार

बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने देशात  एनआरसी  कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. पण हा कायदा काही समाजावर अन्याय करणारा ठरणार आहे. सध्या या कायद्याच्या विरोधात मुस्लिम समाज एकजूट झाला आहे. भविष्यात अन्य समाजातील लोक या कायद्याला विरोध करतील, असेही पवार म्हणाले.

एनआयए तपासाबाबत केंद्रावर टीका

शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकारच्या गृहखात्याच्या अधिकार्‍यांविषयी तक्रारी होत्या. याची चौकशी होणे गरजेचे होते. सकाळी 9 ते 11 या वेळेत राज्य सरकारची यासंदर्भात बैठक सुरू असताना 3 वाजता केंद्र सरकारने हे काम राज्य सरकारकडून काढून घेतले. घटनेनुसार असे कृत्य करणे योग्य नाही, अशा शब्दांत पवार यांनी केंद्राच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केली.Source link

Leave your comment
Comment
Name
Email