कनिष्ठ अभियंत्यास मारहाण नगरसेवक चव्हाणना अटक

कनिष्ठ अभियंत्यास मारहाण नगरसेवक चव्हाणना अटक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

प्रभागात पाणीपुरवठा होत नसल्याच्या कारणावरून महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक अभिजित चव्हाण (वय 31, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) यांना करवीर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी आपटेनगर पंपिंग स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनीही काम बंद आंदोलन केले होते. यामुळे दिवसभर महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. नगरसेवक अभिजित चव्हाण यांच्या प्रभागात पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय अशोक आटकर (वय 28, रा. राजारामपुरी, मूळ रा. कराड) यांना आपटेनगरात बोलावले. दुपारी बाराच्या सुमारास आटकर हे आपटेनगरातील पंपिंग स्टेशनजवळ पोहोचले. ‘माझ्या भागात पाणीपुरवठा का होत नाही’, अशी विचारणा आटकर यांना केली. आटकर यांना शिवीगाळ करत नगरसेवक चव्हाण यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. 

मारहाण झाल्याचा प्रकार समजल्यानंतर महापालिकेतील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. याची माहिती महापालिका आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना कळवण्यात आली. महापालिका अधिकार्‍यांसोबत आटकर हे करवीर पोलिस ठाण्यात आले. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक चव्हाण यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. करवीर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी चव्हाण यांना ताब्यात घेतले. सीपीआर रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटकेची प्रक्रिया करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email