एस.टी. कर्मचारी प्रश्‍नांवर लवकरच निर्णय : शरद पवार

एस.टी. कर्मचारी प्रश्‍नांवर लवकरच निर्णय : शरद पवार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मेहनत करूनही कर्मचार्‍यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसेल तर ती राज्यकर्त्यांची चूक आहे. ती चूक दुरुस्त केलीच पाहिजे, असे सांगत एस.टी. कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होईल. त्यानंतर कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत निर्णय होईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी दिली. तपोवन मैदानात एस.टी. कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यव्यापी अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एस.टी.कामगारांची गेली पाच वर्षे परीक्षा होती, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवार म्हणाले, कामगार संघटनांशी चर्चा करणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, त्यांचे प्रश्‍न समजावून घेणे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. ज्या वेळी संघटनेचे अधिवेशन होते, त्या वेळी राज्यकर्त्यांनी उपस्थित राहिले पाहिजे. गेल्या पाच वर्षांत एस.टी.कडे ढुंकूनही पाहिले गेले नाही. त्यांची किंमत यंत्रणेला भोगावी लागली. कर्मचार्‍यांना केवळ वेदना दिल्या. रावते यांचे हे अधिकार उद्धव ठाकरे यांनी काढून परब यांच्या हाती दिले आहेत.

गेली पाच वर्षे राज्यकर्ते एस.टी.कामगारांना वेदनाच देत होते, असे संघटनेचे नेते आपल्याला नेहमी सांगायचे. तीन तीन महिने कर्मचार्‍यांचे वेतन होत नव्हते. मान्यताप्राप्त संघटनेला डावलून चुकीची पावलेही टाकली गेली, असे सांगत पवार म्हणाले, या कर्मचार्‍यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच एस.टी.च्या कर्मचार्‍यांना वेतन देण्याबाबत सहानुभूतीने विचार केला पाहिजे. कर्मचार्‍यांच्या या प्रश्‍नावर येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घ्या, सचिवांना बोलवा. कामगार संघटनेच्या नेत्यांना निमंत्रित करा, अशी सूचना परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना करत, त्या बैठकीचे नियोजन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी करावे, असे सांगत त्या बैठकीआधीच निर्णय होणार असेल, निर्णय घेण्याची तयारी असेल तर मी त्या बैठकीला उपस्थित राहत नाही, असे स्पष्ट करत कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर लवकरच निर्णय होईल, असे सूतोवाच त्यांनी केले.

पवार म्हणाले, हे तीन पक्षांचे महाआघाडीचे सरकार आहे. त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडले की त्यावर चर्चा करून निर्णय घेतात. यामुळे या कर्मचार्‍यांना जे मिळणार आहे, ते त्यांना दिले पाहिजे, त्याबाबत उद्धव ठाकरे मदत करतील, असे सांगत एस.टी.चा गेल्या पाच वर्षांतील संचित तोटा 5 हजार कोटींचा आहे. आता एस.टी.च्या चांगल्या बसेस येतील, प्रवाशांची संख्या वाढेल,  काही जागा विकसित करण्यासारख्या योजना राबविल्या पाहिजे, राज्यकर्ते  तुमच्या मागे राहील, त्यातून तोट्यातील एस.टी.चे चित्र दोन-तीन वर्षांत दुरुस्त केले जाईल, त्यासाठी कर्मचार्‍यांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

एस.टी. कर्मचार्‍यांना संघर्ष करावा लागणार नाही : परब

एस.टी. प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देते. सुरक्षित प्रवास हे आपले ध्येय आहे. याच महामंडळात मधल्या काळात कर्मचार्‍यांना संघर्ष करावा लागला. मात्र एसटी कर्मचार्‍यांना यापुढे संघर्ष करावा लागणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दिली.

मंत्री परब म्हणाले, परिवहन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर बैठक घेऊन प्रशासन आणि कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. एसटी जोरात पळाली पाहिजे ही आपली भूमिका आहे. त्यासाठी एसटीचा चालक म्हणजेच मालक सक्षम असला पाहिजे. एसटी तोट्यात आहे. म्हणून एसटी कर्मचार्‍यांना उपाशी ठेवणार नाही. एसटीची नव्याने बांधणी करावी लागणारआहे. यासाठी संघटनाआणि कर्मचार्‍यांची साथ हवी आहे. एस. टी. कर्मचार्‍यांचे आतापर्यंत झालेले नुकसान भरून काढण्यात येईल.

ते म्हणाले, एसटी लाईफलाईन आहे. ती टिकली पाहीजे. त्यासाठीच लाल परी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बसेस खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. आज महामंडळाकडे 18 हजार बसेस आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात निकामी बसेस आहेत. अशा बसेसवर धंदा होऊ शकत नाही याची जाण आहे. म्हणूनच दोन हजार नवीन बसेस खरेदीचा प्रस्ताव आहे. प्रवाशांची सुरक्षा आपले ध्येय आहे. तोटा कमी करण्यासाठी काही बदल करावे लागतील. त्यासाठी कर्मचारी आणि संघटनांचे सहकार्य अपेक्षित आहे. एसटी कर्मचार्‍यांवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

प्रश्‍न सुटण्यासाठीच अधिवेशन कोल्हापुरात : पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, एसटी महामंडळ आणि सरकार वेगळे नाही.  सरकारचाच घटक मंत्री म्हणून महामंडळाचा कारभार केला जातो. त्यामुळे कर्मचार्‍यांची महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची  मागणी न्याय आहे. मात्र आर्थिक अडचणी आहेत. व्यासपीठावरील अनेकांनी एसटीने प्रवास केला आहे.  लाल परीने माणुसकी जपली आहे. ती माणुसकी आता आपणही जपली पाहीजे. एसटी म्हणजे सामान्यांचे हृदय आहे. त्यामुळे प्रत्येकाला एसटीबाबत सहानुभूती आणि प्रेम आहे. सरकारकडे नवीन बसेस खरेदीचे प्रयत्न आहेत. एसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी संघटनेने दोन पावले  पुढे यावे, सरकार त्यांच्यासोबत चार पावले पुढे जाईल. कोल्हापूर ही न्याय देणारी भूमी आहे. प्रत्येक गोष्ट संघर्षातून मिळविणार्‍या या नगरीत तब्बल 35 वर्षांनंतर अधिवेशन होत आहे. एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सुटायचे असतील म्हणूनच या नगरीत अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आहे.  खा. शरद पवार यांच्यासारखा सर्वच प्रश्‍नांची जाण असणारा नेता उद्घाटक म्हणून लाभला आहे. यापूर्वी काय घडले याचा विचार न करता भविष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.

मेट्रोचा पांढरा हत्ती सांभाळतो एस.टी.ला बळ का नाही : मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नागपूरसारख्या शहरात सरकारने सुरू केलेली मेट्रो प्रवाशांविना चाललेली दिसली, त्यावेळी वाटले सरकार मेट्रोसारखा पांढरा हत्ती सांभाळतो, मग सामान्यातील सामान्य माणसाला सेवा देणार्‍या एसटीला ही बळ देण्याची गरज आहे. एसटीची सेवा ही सार्वजनिक सेवा आहे. जगातील कुठलीही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा फायद्यात नसते. पण फायद्यात नाही म्हणून ही सेवा बंद करता येणार नाही. तेव्हा एसटीच्या प्रवासी सेवेला बळ देण्यासाठी सरकार मदत करेल. कामगारांच्या ही सर्व मागण्या एका टप्प्यात मान्य होतील, अशी अपेक्षा बाळगू नये, टप्प्याटप्प्याने त्या पदरात पाडूून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

वेतनासाठी करार नको, आयोगच हवा : हनुमंत ताटे

संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे म्हणाले, एसटीचा कर्मचारी 12 तास काम करतो, पगार मात्र कमी व तोही वेळेत मिळत नाही. मागील सरकारच्या काळात कामगारांच्या धोरणाबाबतचे निर्णय फारच वाईट आहेत,  वेतनकरार करताना मान्यताप्राप्‍त संघटनेला विश्‍वासात घेतले नाही. संघटनेच्या मंजुरीविना कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 4849 कोटी मंजूर केले. पण हे वेतन सुत्रात बसत नव्हते.  या करारातीलही 1500 कोटी रुपये कामगारांना अद्याप मिळालेले नाहीत. उलट विविध परिपत्रके काढून कामगारांना अडचणीत आणण्याचे काम प्रशासनाने केले आहे.  त्या कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपत आहे. आता आम्हाला वेतन करारच नको, सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे एसटीच्या कर्मचार्‍यांना वेतनासाठी आयोगच नेमा.

शिवशाहीरूपी एसटीत सवत आणली : अध्यक्ष संदीप शिंदे

मागील सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एसटीची एकही लाल गाडी खरेदी केली नाही, उलट तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी आमच्यावर शिवशाही सारख्या खाजगी बसेस सवतीप्रमाणे एसटीत आणल्या. त्या बसेस चांगल्या चालवल्या नाहीत, मात्र त्याचा मोठा आर्थिक फटका एसटीला बसला. त्यामुळे  आज एसटी आर्थिक संकटात सापडली आहे.  तिला वाचवण्यासाठी सरकारने पुढे यावे. त्यासाठी कामगार संघटना सर्व सहकार्य करेल, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले.

स्वागत संघटनेचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, महापौर सौ. निलोफर आजरेकर, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजेश पाटील, माजी आ. के.पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,शहराध्यक्ष आर.के.पोवार, नगसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक राजू लाटकर, संघटनेच विभागीय सचिव वसंत पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने एसटी कामगार उपस्थित होते.

एस.टी. कर्मचार्‍यांच्या नादी न लागलेले बरे

गेली 40 वर्षे एस.टी. कामगार, साखर कामगार, प्राथमिक शिक्षकांच्या अधिवेशनात जात आलो आहे. त्यातून माझी त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली आहे. पूर्वी कोल्हापुरात जॉर्ज फर्नांडिस, भाऊ पाठक यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिवेशनालाही मी हजर होतो. आपण 1967 ला विधानसभेला उभा राहिलो होतो, त्यावेळी बाजाराच्या एस.टी.त वाहक अमूक गावात पवारांचा जोर आहे, असे प्रवाशांना सांगायचा, मग खरंच जोर असो किंवा नसो, लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवायचे. समाजाला योग्य दिशेने नेण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांच्या नादी लागणे खरे नाही. त्यांचे जे आहे, ते त्यांना देऊन टाकलेलेच बरे, असेही पवार यांनी सांगताच उपस्थित कर्मचार्‍यांनी दाद दिली.

तुम्ही सीएमची काळजी घ्या, दुसर्‍या माणसाकडे मी बघतो

एस.टी. कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांबाबत तातडीने निर्णय होईल. यासाठी दोन लोकांना भेटावे लागेल. तुम्ही एका माणसाची काळजी घ्या, ते सीएम आहेत. त्यांच्याकडे राज्य आहे, असे परिवहन मंत्री परब यांना सांगत दुसर्‍या माणसाकडे मी बघतो, त्यांच्याकडे अर्थखाते आहे, असे पवार यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.

अधिवेशनात तीन ठराव मंजूर

संघटनेच्या सूत्रानुसार एसटी कामगारांना वेतनवाढ लागू करा, एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा आणि कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर निर्णय असे तीन ठराव या अधिवेशनात टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

लाल परीला विद्युत रोषणाई

प्रासंगिक कराराच्या बसेसमधून आलेल्या कर्मचार्‍यांनी आपल्या लाल परीला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले होते. तसेच या बसेसवर त्या त्या भागाची ओळख दर्शवणारे फलक लावले होते. त्यातून त्या भागातील ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळखीच्या खुणा दिसत होत्या.

अधिवेशनास अलोट गर्दी

तब्बल 35 वर्षांनंतर कोल्हापुरात झालेल्या एसटी कामगार संघटनेच्या या 56 व्या अधिवेशनास राज्याच्या कानाकोपर्‍यातून कामगारांनी हजेरी लावली. कर्मचार्‍यांसह महिला कर्मचार्‍यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. कामगारांच्या गर्दीमुळे तपोवन मैदान फुलून गेले होते. राज्यातून येणार्‍या कर्मचार्‍यांना सेवा देण्यासाठी संघटनेच्या कोल्हापूर विभागाने नेटके नियोजन केले होते.

Source link

Leave your comment
Comment
Name
Email