आखाताच्या वाळवंटात भारतीयाने फुलवली भाजी

आखाताच्या वाळवंटात भारतीयाने फुलवली भाजी

गडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

आखातातील वाळवंटामध्ये पाण्याला प्रचंड किंमत असून पाण्याला सोन्याचा भाव आहे, असे म्हटले तरी वावगे होऊ नये. त्यामुळे पाण्याचा वापर करून त्या ठिकाणी भाजीपाला करावयाचा म्हटले, तर वेड्यातच काढले जाईल, अशी स्थिती आहे; मात्र बाथरूम, वॉशबेसिनसह एअरकंडिशनरमधून वाया जाणारे पाणी वापरून एका भारतीयाने या वाळवंटामध्ये भाजी शेती फुलवली असून त्यांच्या या कामांचे अनेकांकडून कौतुक होत आहे. याबरोबरच त्यांचे अनुकरण करून छोटे छोटे वाफे तयार करून वेगवेगळ्या भाज्या लावून स्वतःपुरते उत्पादन घेण्यात येत आहे.

उत्तूर (ता. आजरा) येथील प्रकाश नावलकर हे हॉटेल व्यवसायाशी संबंधित असून ते सध्या दोहाकतार (यूएई) येथे काम करतात. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी ताजी भाजी आपल्याच ठिकाणी घेण्याचे ठरवले; मात्र त्या ठिकाणी इंधन स्वस्त मात्र पाण्याचा दर त्यापेक्षा दुप्पट असल्याने हे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाथरूमसह, वॉशबेसिन, तसेच छाट्या छोट्या कामांतील वाया जाणारे पाणी वापरूनच ही भाजी पिकवण्याचे ठरवले.

यानुसार त्यांनी तातडीने त्या ठिकाणी एक वाफा तयार केला त्यातील मोठ मोठे दगड,धोंडे,मोठी वाळू  बाजूला केली. बाथरूम, वाँशबेसीन, वेस्टेज पाणी तसेच  प्रत्येक रूमला असलेल्या एअर कंडीशनचे पाणी पाईपव्दारे थेट वाफ्याला जोडले.लगतचा पाला,पाचोळा, वेस्टेज कचरा,नको असलेले पेपर हे सगळ जमा करून त्या वाफात टाकून पेटवून त्यापासून मातीसारखा वाफा तयार केला. 

सुरूवातीला प्रयोग म्हणूनच एक वाफा तयार करून त्यामध्ये कोंथबिर टाकली. उगवेल की नाही याबाबत साशंकता असताना चार दिवसातच त्याचे कोंब दिसू लागल्याने भाजी पिकवण्याचा आशा पल्‍लवीत झाल्या. कोंथबिरीचा प्रयोग यशस्वी झाल्याने अशाच प्रकारे अन्य वाफे तयार करून त्यामध्ये भेंडी,वांगी, मेथी,कलींगड,काकडी, कारले,पडवळ अशा भाजा करण्यामध्ये यश आले.

नावलकर यांनी केलेला हा प्रयोग पाहून त्याठिकाणी असलेल्या अन्य लोकांनी त्यांचे कौतुक करत आपआपल्या ठिकाणीही अशाच प्रकारे वाफे तयार करून भाज्या लावल्याने त्यांचा हा परिसर आता हिरवागार दिसत असून वाळवंटामध्येही अशा प्रकारे भाज्या घेता येतात हेच जणू या भारतीयाने दाखवून दिले. 

गावाकडच्या भाज्या खाण्यास मिळाव्यात म्हणून सुरुवातीला प्रयोग म्हणून वाया जाणारे पाणी वापरून वाळवंटामध्ये भाजीचे उत्पादन घेतले. आज या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारच्या भाज्या घेत असून, त्या निमित्ताने गावाकडची आठवण जपण्यात येत असल्याचे समाधान लाभले आहे.

    प्रकाश नावलकर, दोहाकतार (यूएई)

Source link

Leave your comment
Comment
Name
Email